Rohit Pawar Press Conference : सुरुवातीला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही म्हणालो होतो, भाजप लोकनेत्याला जास्त दिवस जवळ ठेवत नाही. जवळ ठेवलच तर त्यांची राजकीय ताकद कमी केली जाते. अजितदादांच्या बाबतीत तेच होताना दिसत आहे. भाजप नेते अजितदादांचा दुजाभाव करत आहेत, याचा अंदाज त्यांच्या वागण्यावरून काही प्रमाणात आला आहे. नेते दुजाभाव करतच होते, पण भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले. म्हणजे हे आश्चर्य आहे. अजितदादांच्या विरोधात बोलणं अनेक लोक टाळत होते. जेव्हा ते पुरोगामी विचाराच्या साहेबांबरोबर होते, तेव्हा त्यांचा दरारा होता. पण भाजपसोबत गेल्यानं तो दरारा कमी झाला आहे, असं वाटतं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, भाजपसोबत अजितदादा राहिले तर त्यांना २० जागाच लढाव्या लागतील. भाजपची एक रणनीती असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांकडून प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा. त्या उमेदवारांच्या माध्यमातून पवार साहेबांनी उभे केलेल्या उमेदवारांची मतं खायची, अशी रणनीती भाजपची असावी. पण ही रणनीती जरी असली, तरी अजितदादांचे जे आमदार आहेत, ते खुळे नाहीत. त्यांना माहितीय, भाजप काय लेव्हलला जाऊ शकते, त्यामुळे भाजपने काहीही विचार केला, तरी आमदार त्यांचा त्यांचा विचार त्याठिकाणी करतील. येत्या काळात भाजपने अजितदादांची राजकीय ताकद कमी केल्याचं पाहायला मिळेल.
अजित पवार गटाचे आमदारविविध पक्षाच्या संपर्कात असतील असं वाटतं. कुणी भाजपच्या संपर्कात असेल, कुणी शिंदे गटाच्या तर कुणी आमच्या संपर्कात असेल. ते पूर्वी दादांची बाजू घेत होते. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तसं काही होताना दिसत नाही. भाजप अतिशय घातक पक्ष आहे. भाजप अतिशय घातक विचार आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून दादांना अधिक मोठ्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असंही रोहित पवार म्हणाले.