राज्यात सध्या भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) असा वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे भोंग्याविरुद्ध आक्रमक झाले असून, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर भाजपने सुद्धा राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता अपक्ष अससेल्या राणा दाम्पत्यानेही उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी धाव घेत हनुमान चालिसेचा मुद्दा उचलून धरला आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे आज अमरावतीतून मुंबईत दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली.
पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही राणा दाम्पत्याने आक्रमक भुमिका घेतली आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार आहे, आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असं राणा दाम्पत्य म्हणाले आहेत. तसंच राज्यातील परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, राज्यात सध्या भार नियमनासारखे अनेक संकटं आहेत. या सर्व संकटात हनुमान चालिसा वाचण्याची गरज असून, मुख्यमंत्र्यांनी फक्त हनुमान चालिसा वाचवून दाखवावी असं आव्हान राणा दाम्पत्याने केलं आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या मुंबईतील आगमनानंतर पुन्हा शिवसैनिकांनी देखील त्यांना आव्हान केलं आहे. ज्या पायावर मुंबईत आलात त्या पायावर बाहेर जाऊ शकणार नाही असं आवाहन शिवसैनिकांनी केलं होतं. त्यामुळे मातोश्री परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार नवणीत राणा आणि रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्या सकाळी ९ वाजता आम्ही मातोश्रीवर जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्या नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.