अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा नवनीत राणा शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकताना दिसत आहेत. लीलावती रुग्णालयातून एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरले. त्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीत दाखल झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी स्वत:च्या तब्येतीचे रिपोर्ट द्यावे असा टोला यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर लगावला आहे.
नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी हॉस्पिटलने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.
याचपार्श्वभूमीर नवनीत राणा यांनी माझे रिपोर्ट हवे असतील तर उध्दव ठाकरेंचे रिपोर्ट आधी घ्यावे. 2 वर्ष तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाहीत. तसेच शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे असा असा आरोप यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर केला आहे.
ठाकरे सरकार विरोधात आणि जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची राणा दाम्पत्य तक्रार करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचीही राणा दाम्पत्य भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा शाधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का? अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.