सैनिक होऊ पाहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात 'अग्निपथ' घेऊन येणाऱ्या केंद्रसरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात आले.
राज्यातील नांदेड - किनवट , औरंगाबाद - सिल्लोड , पुणे - पुरंदर, ठाणे, भंडारा, गोंदिया, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. तर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अमरावती येथे तर कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी पुणे येथे सहभाग घेतला. चंद्रपूर यासह इतर जिल्हयातही युवकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला विद्यार्थी व युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.
दरम्यान, सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेबाबत हिंसक निदर्शने झाली. कोचिंग सेंटरचालकांनी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून तरुणांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते. या आरोपात 9 कोचिंग सेंटर चालकांसह 35 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. याशिवाय आणखी 50 जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
कोचिंग सेंटरचालकांनी हिंसाचाराला चिथावणी दिली
अग्निपथ योजनेमुळे तरुणांनी अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वे ठप्प करून 5 बसेस पेटवून दिल्या होत्या. दोन बसेसची तोडफोड, जटारी पोलीस चौकीच्या खोलीलाही आग लावण्यात आली. दगडफेकीत एडीजी आग्रा झोनच्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. तपासादरम्यान, पोलिसांना आढळून आले की टप्पल आणि जट्टारी येथील 9 कोचिंग सेंटर ऑपरेटर हा हिंसाचार भडकावण्यात गुंतले होते, ज्यांनी सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आणि तरुणांना उपद्रव निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केले.