Narayan Rane Press Conference : मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र ओरबडता, मुंबईची लुट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा. दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रात अन्याय सुरु राहणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंकडे या अभिप्रेयाशिवाय दुसरी काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यांचा अर्थसंकल्पावर स्वत:चा अभ्यास नाही. त्यांनी स्वत:च निर्मला सीतारामण यांच्या सभेत सांगितलं होतं की, मला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही. असं असताना मतं मांडणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या दोन वर्षांच्या राजवटीचा बजेट माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले आहेत, ते माहित आहे. दोन वर्षात त्यांनी विकासासाठी कोणत्याच तरतुदी केल्या नाहीत, असं म्हणत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले, एखाद्या विषय घेतल्यावर शिव्या देण्यासाठी उद्धव ठाकरे तयार असतात. देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, असं ते म्हणाले. मग उद्या महाराष्ट्राने बजेट सादर केला, तर म्हणतील आता इथे कलानगर कुठे दिसत नाही. केंद्राचा बजेट सर्वंकष बजेट आहे. सर्व योजनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे. भारतात महाराष्ट्र आहे आणि ते प्राधान्य मोदी सरकारने दिलेलं आहे.
आम्ही योजना आणून लोकांना लाभ दिला. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आणत आहोत. उद्धव ठाकरे आम्ही दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणून दाखवलं आहे. मोदी साहेब भारत विकसीत देश बनवायला निघाले आहेत. सर्व क्षेत्रातील विकासाठी या बजेटमध्ये तरतूद केली आहे, असंही नारायण राणे म्हणाले.