मुंबई | सुधीर काकडे : नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधत उद्धव ठाकरेंच्या सभेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री काय बोलू शकतात, याचा अंदाज लोकांना आहे असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या 14 मे रोजी झालेल्या सभेच्या आणि सामनामध्ये छापून आलेल्या वृत्तांचा समाचार घेतला. राणे म्हणाले, "ते म्हणतात आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे. मात्र कोणत्या चूली पेटवल्या, किती रोजगार निर्माण केले, किती उद्योग राज्यात आणले. शेतकऱ्यांना नुकसाना भरपाई कधी देणार, मुंबईला सिंगापुर, बँकॉक सारखं जागतिक दर्जाचं शहर बनवणार असं म्हणत होते, मात्र ती बकाल झाली आहे. मुंबई महानगर पालिकेतल्या (BMC) भ्रष्टाचाराप्रमाणे कुठेच भ्रष्टाचार नाही. लाखो लोकं कोरोनामध्ये गेले. दिशा सालियानचा संसार उद्धस्त केला, सुशांतसिंहचा संसार उद्धवस्त केला आणि आता चुली पेटवण्याबद्दल हे बोलतात" असं म्हणत उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) भाषण म्हणजे खोटारडेपणा अशी टीका राणेंनी केली. तसंच भाषणात कामाबद्दल काहीच न बोलता फक्त शिव्या द्यायच्या त्यामुळे यांचं भाषण हे शिवसंपर्क अभियान नाही तर 'शिव्या संपर्क अभियान' होतं असं राणे (Narayan Rane) म्हणाले. (Narayan Rane Press Conference Live)
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, "बाबरी मशिद पाडायला शिवसैनिक होते, तुम्ही होतात का? पहिल्या 35 वर्षात तुम्ही पक्षात कुठे होतात?" असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. रमेश मोरे, जया जाधवची हत्या का झाली? दगडापासून आम्ही शिवसेना उभा केली. साहेबांचा आत्मा वरुन पाहत असेल. त्यांना हे काम आवडत नसेल. हिंदुत्व सोडलं, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. यांच्या हृदयात राम होता की रावण हे आम्हाला माहिती नाही. अशा विकृत बुद्धीची लोकं फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात असं राणे म्हणाले.
सभेला बांद्र्याचे फेरीवाले होते...
मुख्यमंत्र्यांनी आरसा घेऊन स्वत:चा चेहरा पाहा अन् मग दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर टीका करा, मी भाजपमध्ये आहोत, सध्या तुम्ही भाजपच्या अंगावर येऊ नका. शिवसैनिकांना अडीच वर्षात काय दिलं असा सवाल नारायण राणेंनी केला. 35 हजार लोक फक्त सभेला होते, आठ ते दहा हजार बांद्र्याचे फेरीवाले होते. हेराफेरी करुन लोकांचा विश्वास नाही मिळवता येत असं राणे म्हणाले.
सामनामधल्या भाषेवर टीका...
सामनामध्ये असलेली भाषा सुधारा, सणसणीत, खणखणीत लिहीतात, मात्र ते तुमच्या स्वभावात नाही. जो मर्द आहे त्याला सांगावं लागत नाही. शिवाजी महाराजांच्या नावावर भ्रष्टाचार कोण करतंय? यशवंत जाधव कुणाचे आहे. एवढे पैसे यशवंत जाधवकडे सापडत असतील, तर मग मातोश्रीवर आणि अनिल परब यांच्याकडे किती जात असतील असा सवाल राणेंनी केला.
केमिकल लोचाची केस...
राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचाही राणेंनी समाचार घेतला. ही भाषा राज्याच्या मुख्यमंत्र्याची आहे. यांना मुन्ना भाई चालतात, मात्र नवाब भाई चालत नाही. दाऊदशी संबंधीत लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे शिव संपर्क नसून, शिव्या संपर्क आहेत असं राणे म्हणाले.
फडणवीसांसोबत पदासाठी गद्दारी केली...
फडणवीसांवर टीका करतात मात्र तुम्ही त्यांच्यासोबत नांदला आहात. पदासाठी गद्दारी केली. अडीच वर्षांनंतर कोणतंही काम केलं नाही, प्रशासन माहिती नाही, मंत्रालयात जायचं नाही, अधिवेशनात जात नाही असा मुख्यमंत्री असतो का? तुकडे करण्याची भाषा करतात, काय भाजी वाटली का? देवेंद्र फडणवीसांवर वजनावरुन टीका करतात. मात्र त्यांना लोक उत्स्फुर्तपणे ऐकण्यासाठी लोक येतात.
दाऊदशी संबंध असूनही नवाब मलिक मंत्री मंडळात
दाऊदने उद्या भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याला मंत्री करतील असं ते म्हणाले. यांना काय स्वप्न पडलं का? मी आता केंद्रीय मंत्री मंडळात आहे. मी जाऊन सांगु शकतो की, कोणाचे कोणाशी संबंध आहे. नवाब मलिकांचे दाऊशी संबंध असताना सुद्धा त्याला मंत्रीमंडळात ठेवलं. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची संग भोवली असं राणे म्हणाले.
भाजप लोकांच्या हातात धोंडे नाही विचार देतो...
लोकांच्या अण्णाची सोय केली पाहिजे, लोकांची माथी भडकावू नका, लोकांच्या हातात धोंडे घेऊ नका. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, भाजप कधीही कुणाच्या हातात दगड नाही तर विचार देतो. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.
बाळासाहेबांनी यांना मुख्यमंत्री केलं नसतं...
एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं. मात्र हे बाशिंग बांधून शरद पवारांकडे गेले अन् म्हणाले मलाच मुख्यमंत्री व्हायचं. एकनाथ शिंदेंनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं, त्यांनी पैसे खर्च केले. मी हळू हळू सगळ्या गोष्टी बाहेर काढणार असा इशारा राणेंनी लगावला. बाळासाहेब ठाकरे असते तर यांना मुख्यमंत्री केलं नसतं, हे फक्त शरद पवारांमुळे मुख्यमंत्री झाले. कारण शरद पवारांना जास्त राजकारण न समजणारा, फक्त सह्या करणारा माणूस हवा होता असा टोला राणेंनी लगावला.