मी पदवीधर मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा इतिहास मी लोकसभेच्या वेळी ऐकला. पैशांचा बॅगा घेऊन येतात, ते खांदानी श्रीमंत आहेत की नाही, हे मला माहित नाही. एव्हढा पैसा आणला कुठून? याबाबत त्यांची माहिती आम्ही घेत आहोत. ते लोक माणसं विकत घेतात, अशा पद्धतीची चर्चा आहे. रविंद्र चव्हाण टाटा, बिर्लाच्या घरी जन्माला आले होते का, त्याचा शोध घ्यावा लागेल. या पदवीधर मतदारसंघात अशाप्रकारचा प्रयोग केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धाकावर कोट्यावधी रुपये वसुली केले जात आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यासाठी आम्ही यंत्रणाही कामाला लावली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व भ्रष्ट मंत्र्यांना या अधिवेशनात उत्तर द्यावं लागेल, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नाना पटोले म्हणाले,मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार मोठाच आहे. मुख्यमंत्री, कृषीमंत्री, बांधकाम मंत्री, आरोग्यमंत्री, कृषीमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, कामगार न्यायमंत्री, असे अनेक मंत्री आहेत. गेल्या दोन वर्षात या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. महाराष्ट्रात लोकशाही चालली आहे की नाही? शाहु-फुले आंबेडकरांचं अपमान करण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलं आहे. भाजपने शेतकऱ्यांना नेहमी टार्गेट केलं. प्रधानमंत्र्यांनी एमएसपी जाहीर केलीय. डिझेल, खतं, औषधे, बियाणे यांची एमएसपी वाढल्याने महागाईला सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्याने एक रुपया खर्च केला, तर त्याला चार आणेही मिळतील की नाही, असा संशय आता व्यक्त होत आहे. भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ही वस्तुस्थिती आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना दुष्काळ सदृष्य परिस्थिती दाखवली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागली. शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही. पिकाचा नायनाट झाला. मराठवाड्यात बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना समजून सांगितलं की, आम्ही तुमची लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना २०१६ मध्ये फडणवीस सरकारने काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव योजनेला दिलं, आम्हाला चांगलं वाटलं. पण २०१६ ते २०१९ या काळातही फडणवीस कर्जमाफी करू शकले नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने सरसकट कर्जमाफी केली.
पण प्रोत्साहानाचे ५० हजार द्यायचे होते, तेव्हा कोरोनाचा काळ होता. राज्याच्या तिजोरीत चंचण असताना आम्ही सांगितलं की, पुढच्या बजेटमध्ये तरतुद करुन देतो. पण खोक्याच्या सरकारने महाराष्ट्रात असंवेधानिक सरकार आणून अद्यापही शेतकऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहन मिळालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढलेल्या योजनेतून कर्जमाफी झाली नाही. मी सरकारला वारंवार सांगत आहे की, सरसकट कर्जमाफी तातडीनं करा. शेतकऱ्यांना मदत करा. पण मदत केली जात नाही, असंही नाना पटोले म्हणाले.