महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची आज मुंबईत बिकेसी येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला राहुल गांधी, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित होते. या सभेत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात युवक, महिला, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान आजच्या सभेत कॉँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करत महायुतीवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा
1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
2. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
3. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
5. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.
या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका
महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जात आहेत. इथल्या भूमीपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात आहेत. प्रकल्प गुजरातमध्ये गेले म्हणून विरोध नाही, तर प्रकल्प इथे सुरू होत असतानाही ते तिकडे का नेले जातात हा प्रश्न आहे? असा प्रश्न केला आहे. ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे आंबेडकरांचं संविधान, एकता, समानता, प्रेम, आदर आहे आणि दुसरीकडे द्वेष, समोरून नाही छुप्या पद्धतीने भाजपचे लोक संघाचे लोक या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता निवडणुकांचे फटाके फुटू लागले आहेत. आपल्याकडे चांगले एटम बॉम्ब आहेत. तर पलीकडून फुलबाज्या सुरू आहेत. मात्र 23 तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. सध्या महागाई इतकी वाढली आहे की अनेक घरांमध्ये फरलचे पदार्थच गायब झाले आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण आपल्या 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. आनंदाच्या शीधेमधून उंदराच्या लेंडया देते हा आहे का तुमचा आनंद?’ असा सवाल उद्धव ठाकरे केला आहे.