फटाक्यांवरील निर्बंध, वायुप्रदूषण आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी गुरुवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील शिवडी येथे अति वाईट हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला.
‘समीर’ अॅपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईच्या हवेचा दर्जा श्रेणीत नोंदला गेला. उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध घातल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी मुंबईकरांनी बंधन झुगारून फटाके उडविले. शहरात गुरुवारी दुपारपर्यंत सर्व भागांतील हवा ‘मध्यम’ श्रेणीत होती. त्यानंतर सायंकाळी ६ नंतर अनेक भागांतील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ स्तरावर होती.
शिवडी येथील हवा निर्देशांक गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ३१० इतका म्हणजेच ‘अतिवाईट’श्रेणीत नोंदला गेला. त्याचबरोबर भायखळा, देवनार, वांद्रे, मालाड, कांदिवली या परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१४, २००, २१७, २१५, २४५ इतका होता.