महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०२०’ उत्तीर्ण होऊन शिफारस झालेले उमेदवार दीड वर्षांनंतरही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दोनदा आंदोलन, उपोषण करूनही या उमेदवारांना अद्यापही नियुक्तिपत्र मिळालेले नाही.
सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना (एसईबीसी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून लाभ देण्याचा शासन निर्णय रद्द झाल्याने व त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे उमेदवारांना अद्यापही नियुक्तिपत्र देण्यात आलेले नाही. परंतु ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकूण २१ जागांबाबत न्यायालयात वाद प्रलंबित असताना इतर प्रवर्गातील १९६ उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तिपत्र देणे शक्य असूनही ते देण्यास राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्याकडून सातत्याने दिरंगाई केली जात आहे, असे उपोषणकर्ते एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्यांचे म्हणणे आहे.
‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०२०’ या परीक्षेची जाहिरात १८ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २७ मार्च २०२१ रोजी पूर्व परीक्षा, १८ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य परीक्षा आणि मे २०२२ मध्ये मुलाखती झाल्या. परीक्षेचा निकाल ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२२ रोजी परंतु जवळपास दीड वर्ष झाल्यानंतरही उमेदवारांच्या हाती नियुक्तिपत्र न आल्यामुळे एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्यांनी तिसऱ्यांदा उपोषणाचा निर्णय घेतला.