सप्टेंबरमध्ये देशभरात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरमध्ये 109 टक्के पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये 16 टक्के अधिक पावसाची नोंद होती. देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन आठवड्यांत लागोपाठ कमी दाबाच्या क्षेत्रांची शक्यता असल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास काहीसा उशिरा सुरू होऊ शकतो, असे 'आयएमडी'ने म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात चांगल्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 109 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. देशात सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 167.9 मिलिमीटर आहे. म्हणजेच एवढा पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरी पडतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या सप्टेंबर महिन्यात या सरासरीपेक्षा 9 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.
पश्चिम व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1-2 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. तर, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 ते 4 सप्टेंबर आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.