तिरुअनंतपुरम : केरळमध्ये देशातील दुसरा मंकीपॉक्सचा (Monkeypox) रुग्ण आढळला आहे. 31 वर्षीय तरुण गेल्या आठवड्यात दुबईहून केरळमध्ये (Keral) आला होता, त्यानंतर तो मंकीपॉक्स पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये आढळून आलेला मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण असून, देशातील ही दुसरी घटना आहे. केरळमध्येच पहिलं प्रकरण आढळून आलं आहे. 13 जुलै रोजी केरळमध्ये आलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी असून, तिथल्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. रुग्णाच्या जवळच्या लोकांच्या संपर्कात असलेल्या सर्वांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय.
पाच विमानतळांवर आरोग्य विभागाची नजर
केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारपासून राज्यातील पाचही विमानतळांवर प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. कन्नूर विमानतळावर विशेष सुविधा उभारण्यात आल्या आहेत. देशात मंकीपॉक्सची पहिली केस केरळमध्येच आढळली होती. कोल्लम जिल्ह्यातील एका 35 वर्षीय पुरुषाला मंकीपॉक्सची लागण झाली आणि त्याला तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.