लखनऊ : उत्तरप्रदेशमधील बरेली येथून धक्कादायक घटना समोर येत आहे. माकडांच्या टोळीने एका चार महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या वडिलांच्या हातून खेचून घराच्या छतावरुन खाली फेकले. यावेळी चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, बरेलीच्या शाही क्षेत्र दुनका येथील निर्देश उपाध्यय रात्रीच्या वेळेस घरात गरम होत असल्याने छतावर चार महिन्याच्या बाळाला घेऊन गेले. यावेळेस अचानक माकडांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी त्यांनी आरडा-ओरडही केला. आवाज ऐकून घरातील लोकांनी छताकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत माकडांनी निर्देश यांच्या हातून बाळाला ओढून खाली फेकले. तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सात वर्षानंतर घरात दुसरे बाळ जन्मला आले होते. त्यांच्या नामकरणाची तयारी सुरु होती. परंतु, त्याआधीच आनंदाचे दुःखात रुपांतर झाले. याआधीही कुत्रे आणि माकडांनी चिमुकल्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु, याकडे प्रशासनाने सस्पेशल दुर्लक्ष केले आहे.