पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी समृध्दी महामार्गासह अनेक प्रकल्पाचे लोकर्पण पार पडले. पहिल्या टप्प्यात हा रस्ता नागपूरपासून शिर्डीपर्यंतच झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाच्या निमिताने संधी साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरच प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनीही हा मार्ग कुणी आपल्यामुळेच झाला असं समजू नये असे म्हणाले होते. त्यावरुनच आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, उद्धव ठाकरे हे ९४३ दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने कुठला एकतरी प्रकल्प उभारला का? एखादा असा प्रकल्प ज्यामुळे इतिहासात त्यांची आठवण कायम राहील. मी ट्रोलर्सच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं आहे.
त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गात अडथळा आणण्याचे प्रयत्न केले. मुंबईतील मेट्रो आरे कारशेड रोखले. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध. वाधवान बंदराला विरोध केला. उद्धव ठाकरे हे विकासाच्या विरोधात का आहेत? असं प्रश्न मोहित कंबोज यांनी उपस्थित केला आहे.