मोदी मंत्रिमंडळाने सोमवारी संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये दीड तास मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असून १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे.
संसदेच्या या पाच दिवसांच्या अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या २० किंवा २१ सप्टेंबरला महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष सत्रात मांडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदी सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.
संसदेच्या विशेष सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेत शेवटचं भाषण केलं. लोकसभेत केलेल्या या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंपासून ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाचं कौतुक करत राष्ट्र निर्माणामध्ये सगळ्या पंतप्रधानांच्या योगदानाची आठवण काढली.