निसार शेख, रत्नागिरी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात तोफ धडाडणार आहे. ते या दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून पक्षसंघटन वाढीसाठी विशेष कानमंत्र देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणस माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तसेच संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर येत आहेत. दि. ३ ते ६ डिसेंबर दरम्यान ते रत्नागिरी जिल्ह्याचा झंझावाती दौरा करणार असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजापूर कार्यालयाचे उद्घाटन, राजापूर येथे विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी बैठक. यावेळी दोनशे महिलांचा महाराष्ट्र निवनिर्माण सेनेत प्रवेश होणार आहे. सायंकाळी ४ वाजता लांजा बाजारपेठ येथे अजिंक्य हॉलमध्ये तालुक्याची बैठक़ होणार आहे. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी विश्रामगृह येथे मान्यवरांच्या भेटीगाठी. त्यानंतर जुना माळनाका येथे रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन. त्यानंतर रत्नागिरी विश्रामगृह येथे विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ५ वाजता देवरूख येथे गडकरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन होईल व संगमेश्वर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक होईल.
दि. ५ रोजी सकाळी ९ वाजता गुहागरमध्ये मनसे कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सकाळी ११ वाजता चिपळूण विश्रामगृह येथे चिपळूण विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक. सायंकाळी ४ वाजता खेड येथील द. ग. तटकरे सभागृहात खेड तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दापोली व मंडणगड तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक साई निधी हॉल येथे होईल. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून तालुका- तालुक्यात नियोजनाच्या बैठका सुरू आहेत व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यादरम्यान कोणकोणत्या पक्षातील नाराज मनसेच्या गळाला लागतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी पदाधिकारी झटताना दिसत आहेत.