राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार येथून सुरु झाली आहे. कॉंग्रेसची ही यात्रा १७ मार्चला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पोहोचणार आहे. तत्पूर्वी, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींवर घणाघात केला आहे. "छत्रपती शिवाजी मैदानावर अनेक भाषणं झाली आहेत. त्याच मैदानावर कोल्ह्यांची कुईकुई ऐकावी लागणार. इथे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक व्यक्तव्य केलं, तर ही मराष्ट्राची १४ कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही", असा इशारा देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
संदीप देशपांडे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, "अनेक दिग्गजांच्या वाघाच्या डरकाळ्या ज्या शिवतीर्थावर ऐकल्या आहेत, त्याच शिवतीर्थावर १७ तारखेला दुर्देवाने काँग्रेसच्या कोल्ह्यांनी कुईकुई ऐकण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राला लाभणार आहे. वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे त्यांच्याबरोबर असतील, असं वाटतंय. लोकशाहीत प्रत्येकाला त्यांचं म्हणण मांडण्याचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. तुम्ही महाराष्ट्रात येताय तुमचं म्हणणं मांडा, आमची हरकत नाही. पण इथे येऊन सावकरांबद्दल अपमानजनक व्यक्तव्य केलं, तर ही मराष्ट्राची १४ कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही."
नंदूरबार येथून महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेला सुरुवात करून राहुल गांधी यांनी महायुती सरकारला धारेवर धरण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी संवाद साधून स्थानिक प्रश्नांबाबत राहुल गांधी विचारपूस करताना दिसत आहेत. मोदी सरकार आणि देशातील बड्या उद्योगपतींनी सामान्य जनतेला विकासापासून दूर ठेवलं आहे, असं राहुल गांधी जनतेला संबोधीत करताना म्हणत आहे.