सुरज दाहत|अमरावती : ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. यातच 18 सप्टेंबर पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, त्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अमरावतीत आले यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्रातील मोठा प्रोजेक्ट वेदांत हा गुजरातला पळवल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टिका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे नाटक करत आहे. यात राजकारण केलं जात आहे. आंदोलन करून प्रकल्प परत येणार नाही. नेमका गुजरातला प्रकल्प का गेला याची सखोल चौकशी केली पाहिजे यामध्ये राजकारण न करता सर्वांनी सोबत येऊन एकत्र लढा दिला पाहिजे, या पुढचे प्रकल्प कसे महाराष्ट्रात राहील याचा विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.
राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात मनसैनिकाची संवाद साधणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सध्या स्वबळावर निवडणूक लढणार आहे. सर्व जागेवर ताकदीनिशी कसा लढा देता येईल याचा अभ्यास चालू आहे. तूर्तास भाजपसोबत युती करण्याची आमची मानसिकता नाही असं स्पष्ट मत संदीप देशपांडे आणि यावेळी व्यक्त केलं.