मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पत्रकारिता आणि सध्याच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. सोबतच ट्रोलिंग करणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.
ट्रोलिंग करणाऱ्यांवर हल्ला
पत्रकारांवर हल्ले होतात हे चुकीचं आहे. तुम्ही म्हणताना तुम्ही लिहिल्यावर तुम्हाला ट्रोल केलं जातं. मग वाचता कशाला? मुलाखत झाली, भाषण झालं, एकदा शब्द गेले ना. मग कुणाला काय वाटेल ते वाटेल. कुणाला आवडलं, कुणाला नाही आवडलं हे कशाला वाचत बसता. त्यावर चार शिव्या पडतात. मग आमचा हिरमसून बसतो. कशाला वाचता? मोबाईल नावाचं खेळणं आल्यापासून अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले. घरात बसून करायचं काय? मार याच्या, घाल बोटं असं सुरू आहे, असा हल्ला राज ठाकरेंनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर चढवला.
ट्रोल करणाऱ्याला काही पडलेली नसते. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. बास फक्त व्यक्त व्हायचं. राजकीय लोकांनी पाळलेली लोकं आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? ते पाळलेले आहेत. त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता? जे महाराष्ट्र हिताचं असेल, मराठी माणसाच्या हिताचं असेल त्यावर निर्भिडपणे बोलणं आणि लिहिण्याची गरज आहे. आज नाही उद्या पटेल. विरोधकांनाही पटेल. आपण चुकीचं करतो हे त्यांना वाटेल, असं ते म्हणाले.
पत्रकारितेतही भलतंच सुरू
सध्या पत्रकारितेतही भलतंच सुरू आहे. याला काय वाटतं आणि त्याला काय वाटतं हेच सध्या सुरू आहे. टेलिव्हजनवर आजही चांगलं काम करणारे लोक आहेत. पण व्हिज्युअली जे समोर दिसतं ते हेच आहे. राजकारणाची भाषा घसरली. ते वाह्यातपणे बोलत लागेल. कारण तुम्ही दाखवता म्हणून. तुम्ही बंद करा. ते कुठे बोलतील संडासात? असा सवालही त्यांनी केला.
पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणे हे तुमचं काम नाही. पत्रकारांना काही बोललं की त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटतं, मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटत नसेल का? म्हणजे तुमचं ते कुटुंब अन आमचं काय? याचं भान पत्रकारांनी ठेवायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.
हे मी खपवून घेणार नाही
पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. मला सांगा, 2009 ते आज वर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ते जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच, असं राज ठाकरे म्हणाले.