राज्यात राजकीय भुकंप झाला , सत्तांतर झालं, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व राजकारणापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी या सर्व सत्तापालटावर व आता सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर देखील फारसं बोलणं आतापर्यंत टाळलं आहे. मात्र, आता राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये येणार आहेत.
राज ठाकरे करणार महाराष्ट्रभर दौरे:
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे व औरंगाबाद येथे सभा घेतल्या होत्या. शेवटी झालेल्या औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने ते तितकेसे सक्रीय दिसले नाहीत. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा दौऱ्याची वाच्यता केली.
असा असेल राज ठाकरेंचा विदर्भ दौरा:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर
17 सप्टेंबरला मुंबईवरून ट्रेनने नागपूरला होणार रवाना
18, 19 सप्टेंबरला पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक
21 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावतीसाठी रवाना
21, 22 सप्टेंबरला अमरावतीत पदाधिकारी कार्यकर्ता बैठक
आजची मनसेची बैठक ही याच दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीमध्ये विदर्भ दौऱ्यातील कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या संदर्भातील रणनीती विषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे
अमित ठाकरेसुद्धा अॅक्शन मोडमध्ये:
राज ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील सध्या अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. मनविसे पुनर्बांधणी अभियानातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांशी भाग पिंजून काढला तर, गणेशोत्सवानंतर मनसेने आयोजित केलेल्या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेतही ता स्वत: सहभागी झाल्याचं दिसून आलं