राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप शरद पवारांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केला होता. "पुढील आठ दिवसात मी दम दिलेली एकतरी व्यक्ती समोर आणा. आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा", असं प्रत्युत्तर शेळके यांनी पवारांना दिलं होतं. आता पुन्हा शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी माझ्यावर आरोप करणं योग्य नाही. पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, असं मी कार्यकर्त्यांना म्हटलंच नव्हतं, असं ते माध्यमांशी बोलताना नुकतच म्हणाले.
शेळके म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वीही स्पष्टीकरण दिलं. पवार साहेब मावळ ताल्युक्यात येत असताना, मी कुणालाही कार्यक्रमाला जाऊ नका, असं म्हटलं नव्हतं. मी कोणत्याही कार्यकर्त्याला फोन केला नव्हता. पण साहेब माझं नाव घेऊन थेट मला असं का बोलले, असा प्रश्न मला पडलाय.
"आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा. शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्य वाटलं. मेळाव्याच्या आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली.अजित पवारांना खलनायक करण्याचा प्रयत्न करु नये", असंही शेळके म्हणाले होते. मावळ तालुक्यात शरद पवारांनी केलेल्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात राजकीय वातावरण तापलं होतं.