विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरून वाद झाला, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. पंरतु, आता थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
महेंद्र थोरवे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “आम्ही मागील सव्वा वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत एकत्रितपणे प्रामाणिकपणे काम करतोय. मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. मंत्री दादा भुसे यांच्या खात्यातील ते काम आहे. माझ्यासह भरतशेठ गोगावले त्यांच्या खात्यातील कामाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना कॉल करुन सांगितलं होतं.
थोरवे पुढं म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदेंनीही त्यांना संपर्क साधून सांगितलं होतं की, ते काम करुन घ्या. मी दादांना विचारलं की, बाकीच्या लोकांची कामे तुम्ही बैठकीत घेतलीत. मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा केलं गेलं नाही. ते माझ्यावर थोडे चिडून बोलेले. आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. मुख्यमंत्र्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.”
मंत्री म्हणून तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे. त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. अशाप्रकारे अरेरावीनं उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. मी सांगितलेलं काम जनतेचं आहे. माझ्या मतदार संघातलं काम आहे. त्यांना हे मी सांगायला गेल्यावर त्यांचं याबाबत पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. म्हणून आमच्यात शाब्दिक चकमक झाली, असं थोरवे म्हणाले.