काही दिवसांपासून रोजच्या गरजेच्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. याचा जोरदार फटका सर्वसामान्यांन सोबतच McDonald's वाल्यांना सुद्धा बसला आहे. मॅकडोनाल्डच्या बर्गर अथवा इतर खाण्याच्या पदार्थात आता यापुढे टोमॅटो दिसणार नाहीत. नकंपनीने टोमॅटोच्या वाढीव किंमतींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देशात टोमॅटोच्या किंमतींमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या गुरुवारी टोमॅटोच्या किंमती १६५ रुपये प्रती किलोंच्या घरात पोहोचल्या होत्या. ग्राहक मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोलकातामध्ये टोमॅटो सर्वाधिक १५२ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये १२० रुपये, चेन्नईत ११७ रुपये आणि मुंबई १०८ रुपये प्रति किलो दर आहेत.
मॅकडोनाल्ड कंपनीने आज 7 जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो आपल्या मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या (उत्तर आणि पूर्व विभाग) प्रवक्त्याने सांगितले की हंगामी समस्यांमुळे मॅकडोनाल्ड्सने आपल्या खाद्य मेनूमध्ये टोमॅटो समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅकडोनाल्ड्सच्या भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील फ्रँचायझींनी असे म्हटले आहे की त्यांच्या 10 ते 15 टक्के स्टोअर्सना खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु कंपनीला या क्षेत्रांमध्ये टोमॅटोच्या उपलब्धतेच्या कोणत्याही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. मॅकडोनाल्ड्स इंडिया वेस्ट आणि साउथने म्हटले आहे की ही एक हंगामी समस्या आहे आणि रेस्टॉरंट्स तसेच खाद्य उद्योगांना दरवर्षी पावसाळ्यात या महागाईचा सामना करावा लागतो.