उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांनीही आज आपला उमेदवार जाहीर केला. विरोधी पक्षाने 'मार्गारेट अल्वा' यांना उप राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नामांकन प्रक्रिया 19 जुलैपर्यंत होणार आहे. त्यानंतर 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 जुलैपर्यंत नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांची नावं मागे घेता येतील. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. (Presidential Election of India 2022)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या परिषदेत व्यस्त होत्या. आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला असून, लवकरच ते मार्गारेट अल्वा यांनाही पाठिंबा जाहीर करणार आहेत.
कोण आहेत मार्गारेट अल्वा ?
मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी मंगळुरू येथे झाला. अल्वा यांचं शिक्षण बंगळुरू येथे झालं. 24 मे 1964 रोजी निरंजन अल्वा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं आहेत. निरंजन अल्वा हे स्वातंत्र्यसैनिक असून, खासदार असणाऱ्या जोआकिम अल्वा आणि व्हायोलेट अल्वा या पहिल्या जोडप्याचे ते पूत्र आहेत.
राजकीय प्रवास
मार्गारेट अल्वा 1974 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यांनी प्रत्येकी सहा वर्षे सलग चार टर्म पूर्ण केल्या. यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी 1984 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्रिपद आणि नंतर युवा कार्य आणि क्रीडा, महिला आणि बालविकास मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. 1991 मध्ये त्यांना कार्मिक, पेन्शन, सार्वजनिक वंचित खटला आणि प्रशासकीय सुधारणा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अल्वा या राजस्थान, गोव्यासह अनेक राज्यांच्या राज्यपाल राहिल्या आहेत.