मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
जालन्यात मराठा-ओबीसी संघर्षाची शक्यता वर्तवण्यात येत असून जालन्यात मराठा-ओबीसी समाजाचे उपोषण सुरु आहे. अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांचं तर वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरु आहे. अंतरवालीसह वडीगोद्रीला पोलीस छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.