मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे ते सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. गुडी पाडव्यानिमित्त घेतलेली सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि भविष्यात औरंगाबादमध्ये (Aurangabad) होणारी सभा यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. मनसेने घेतलेली ही भूमिका फक्त राज्यासाठी मर्यादीत नसून, देशात हा मुद्दा चर्चेत असल्याचं मनसेकडून सांगण्यात येतंय. त्यातूनच जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंची सभा लोकांनी ऐकल्याचा दावा मनसेकडून (MNS) करण्यात येतोय. या सर्व घडामोडी घडत असतानाच तिकडे उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याचं काम पोलिसांनी केलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी योगींचं कौतूक केलं. त्यावरुन शिवसेनेच्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मशिदीच नव्हे तर मंदिरावरील अनधिकृत भोंगेही योगी यांनी उतरवले आहेत." असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे किंवा मनसे आता यावर काय उत्तर देणार असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान, मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वादाच्या भुमिकेमुळे याबद्दल शक्यता वर्तवण्यात येत होत्या. आगामी काळातील महानगरपालिकांच्या दृष्टीनं हे समीकरण महत्वाचं मानलं जातंय.