राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात विविध मागण्यांसाठी अनेक संघटना नागपूरच्या विधान भवन परिसरात मोर्चे घेऊन धडकण्याची शक्यता आहे. ६० हून अधिक मोर्चे विधान भवनावर येऊ शकतात.
याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अत्याधुनिक पाच सुसज्ज दक्षता वाहने, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, बारा बॉम्बशोधक-नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. पुढील १२ दिवसांत तब्बल ६० मोर्चे निघणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. वादळी ठरलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात विविध मुद्दे नव्याने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर आता हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.