संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या निवडणुकीच्या चर्चांना उधाण आलं होतं. लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ५४३ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केलीय. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार आहेत. १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे तिसरा टप्पा , चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
19 एप्रिल - पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघ - नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
26 एप्रिल - दुसऱ्या टप्पायत 8 मतदारसंघ - वर्धा, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
7 मे - तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघ - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
13 मे - चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघ - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
20 मे - पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघ - मुंबईचे सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं. जगातील महत्त्वाच्या देशात २०२४ ची निवडणूक होणार आहे. जगातील सर्वात मोठी आणि जीवंत लोकशाही आहे. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. देशात ९७ कोटींहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. दोन वर्षांपासून निवडणुकीची चर्चा सुरु आहे. जवळपास ८०० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. काही अपवाद वगळता ११ राज्यातल्या निवडणूका शांततेत पार पडल्या.
देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. देशात ४७.१५ कोटी महिला मतदार आहेत. प्रथम मतदार १.८४ कोटी आहेत. ९६.८८ कोटी एकूण मतदार आहेत. २१.५० कोटी तरुण मतदार आहेत. ८५ वर्षांवरील ८२ लाख मतदार आहेत. १०० वर्षांवरील २ लाख १८ हजार मतदार आहेत. ४८ हजार मतदार तृतीयपंथीय आहेत. महिला मतदारांचं प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असणार आहेत. मतदान केंद्रांवर व्हिलचेअर, पिण्याचं पाणी, शौचालय, असणार आहेत. पोलिंग बुथवर जे येऊ शकत नाहीत, त्यांसाठी घरोघरी मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार. दिव्यांगानाही घरातून मतदान करता येणार आहे.
कुमार पुढे म्हणाले, फॉर्म १२ डी भरुन घरुन मतदान करता येणार. मतदानाबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. नो युवर कॅंडिडेट अॅपवर उमेदवारांची माहिती सादर करण्यात येईल. मतदाराला तक्रार करायची असल्यास सी-व्हिजील अॅपवर करता येणार. मसल पॉवर, मनी पॉवर आणि अफवा रोखण्याचं आव्हान आमच्यासमोर असणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसेला स्थान नाही. गुंडगिरी रोखण्यासाठी सीएपीएफ तैनात करणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम दिलं जाणार नाही.
हिंसा रोखण्यासाठी अधिक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचार झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. ३४०० कोटींची रोकड आतापर्यंत रोखली आहे. पैशांचा गैरवापर निवडणुकीत होऊ देणार नाही. काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशांचा गैरवापर केला जात आहे. ५५ लाखांपेक्षा जास्त इव्हीएम तयार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवू देणार नाही. निवडणुकीत हेलिकॉप्टर आणि विमानांतून येणाऱ्या वस्तुंची तपासणी केली जाईल. निवडणुकीत फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रंणांना आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात कुणावरही वैयक्तिक टीका करु नये. आक्षेपार्ह वक्तव्य, द्वेष पसरवणारी भाषा प्रचारता नको. प्रचार करताना मर्यादा ओलांडू नका. दिशाभूल करणाऱ्या जाहीराती रोखल्या पाहिजेत. द्वेष पसरवणाऱ्या भाषणांवर आमची नजर असणार आहेत. निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करु नका. केंद्रीय निवडणूक आयोगाचे २१०० निरीक्षक नेमणूक करण्यात येतील.