राज्यात पावसानं काल (बुधवारपासून) हाहाकार माजवला आहे. काही भागात नद्या - नाले भरुन वाहू लागले आहेत. नद्यांना पूर आला आहे. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. मध्य आणि दक्षिण भारतासह महाराष्ट्रात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आणि कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.
गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांत पुढील पाच ते सहा दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस सक्रिय राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून कोकण, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार आहे. ९ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे.