सर्वाधिक पावसाचे पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 250 इंच पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षपिक्षा यंदा 20 इंच अधिक पाऊस तालुक्यात झाला आहे. दोन दिवसांपासून शहर व ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे महाबळेश्वरकरांना गणेशोत्सवही पावसातच साजरा करावा लागला आहे.
सतत सुरू असलेला पाऊस कधी थांबतोय, याची वाट आता नागरिक पाहत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात गतवर्षी पूर्ण पावसाळी हंगामात 5780.30 मिमी (227.57 इंच) पावसाची नोंद झाली होती. यंदा गतवर्षर्षीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे. तसेच आणखी 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आणखी पाऊस होण्याचीही शक्यता आहे.
महाबळेश्वरमध्ये 01 जून ते 01 जुलै अखेर 870.60 मिमी म्हणजेच 34.27 इंच, 01 जुलै पासून 31 जुलै या मुख्य पावसाळी महिन्यात तब्बल 3 हजार 335.9 मिमी म्हणजेच 131.33 इंच पावसाची नोंद झाली होती.ऑगस्ट महिन्यामध्ये 1 हजार 593.2 मिमी म्हणजेच 62.72 इंच पावसाची नोंद झाली. 01 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 6 हजार 294.9 मिमी म्हणजे 247.83 इंच पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच गतवर्षपिक्षा 20 इंच अधिक पाऊस झाला आहे.