इम्तियाज मुजावर, सातारा
महाराष्ट्राचे प्रसिद्ध नंदनवन आणि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ अशी ओळख असलेलं महाबळेश्वर गारठलंय. जोरदार वारे असून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला असून, महाबळेश्वर येथील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात थंडीचे प्रमाण अधिक आहे. या पर्यटनस्थळावरील बाजारपेठ व परिसराचा पारा साधारण १५ अंश सेल्सिअस, तर वेण्णालेक येथे ९ ते १० अंशांवर आला आहे.
येथील थंडीचा कडाका निसर्गरम्य पर्यटनस्थळाची नजाकत दाखवून देत आहे. महाबळेश्वर सोडून काही किलो मीटर अंतर गेल्यावर थंडीने हुडहुडी भरते. मात्र, महाबळेश्वर येथे आल्यावर आपणाला गुलाबी थंडीचा फिल अनुभवता येतो. सध्या गुलाबी थंडी पर्यटक अनुभवत आहेत.
महाबळेश्वर येथे पर्यटकांची अद्यापही रेलचेल असून, येथील गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. सध्या स्वेटर, कानटोपी, शाली परिधान करून मुख्य बाजारपेठेमध्ये पर्यटक फेरफटका मारताना दिसत आहेत. या पर्यटनस्थळावरील बाजारपेठ व परिसराचा पारा साधारण १५ अंश सेल्सिअस, तर वेण्णालेक येथे ९ ते १० अंशांवर आला आहे.