महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि मविआमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 30 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
वंचितने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 10 उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे वंचितकडून आतापर्यंत 51 उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. धुळे शहर मतदारसंघासाठी जितेंद्र शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते बौद्ध समाजाचे असल्याचं प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. सिंदखेडा मतदारसंघातून राजपूत समाजाचे भोजासिंग तोडरसिंग रावल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमरेड मतदारसंघातून बौद्ध समाजाचे सपना राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बल्लारपुर मतदारसंघातून कुणबी समाजाचे सतीश मुरलीधर मालेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे.