वर्धा (भूपेश बारंगे) :- वर्ध्यातील गिरड शिवारात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर मनोज फोफारे स्वतःच्या बकऱ्या चारत असताना पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण बकऱ्या मोठ्या झाडाच्या खाली उभ्या होत्या. यावेळी आकाशात जोरदार वीज कडाडली यात झाडावर वीज कोसळल्याने त्याच्याखाली असलेल्या 23 बकऱ्या जागीच ठार झाल्या आहेत. यात काही बकऱ्या सैरावैरा पळून गेल्याने बकऱ्या वाचल्या तर बकरी चारण्यासाठी गेलेला मुलगा काही अंतरावर असल्याने थोडक्यात बचावला आहे. यात श्रीराम फोफारे यांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. (Lightning kills 23 goats in Wardha)
दरम्यान, वर्ध्यात शनिवारी मुसळधार आलेल्या पावसात 19 मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शहरातील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले दोन चिमुकले पाण्यात बुडाले. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली असून बुडालेल्या दोघांपैकी एकाच मृतदेह सापडला आहे, तर दुस-याचा शोध सुरु आहे.
पुलगाव येथील बरांडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. हा पूर पाहण्यासाठी येथीलच प्रणय जगताप (वय 14 वर्ष ) आणी आदित्य शिंदे (वय 15 वर्ष ) हे दोघेही गेले होते. दरम्यान, हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. प्रणय जगताप या मुलाचा मृतदेह सापडला असून आदित्य शिंदे या मुलाच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच जण मृत पावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात थैमान घातले आहे. अनेक भागातील घरे पाण्याखाली आल्याने सर्वसामान्य कुटुंब उघड्यावर आले आहेत. अतिवृष्टी झालेल्या परिसरातील हजारो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहुन गेलेले दोघे अद्यापही बेपत्ता आहेत. प्रशासन शोधकार्य सुरू केले आहे.