पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासोबत मोठा अपघात झाल्याचं वृत्त आहे. पाटणा येथील राबडीदेवी निवासस्थानी पायऱ्या चढत असताना लालू प्रसाद यादव खाली पडल्याचं वृत्त आहे. लालू प्रसाद यादव यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या उजव्या खांद्याचं हाड या अपघातात तुटलंल्याचं सांगितलं जातंय. यासोबतच त्यांच्या कमरेलाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येतंय. लालूप्रसाद यादव यांच्यावर कंकरबाग येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्लास्टर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना घरी आणण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
खांद्याला आणि पाठीला दुखापत
लालू प्रसाद यादव यांना पायऱ्यांवरून पडल्यानंतर खांद्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. मात्र, तपासणीअंती घाबरण्यासारखं काही नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आरजेडी प्रमुखांच्या उजव्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे, लालूंच्या अपघाताबद्दल वृत्त समजताच नेते आणि कार्यकर्ते चिंतेत पडले असून अनेकजण राबडीदेवींच्या निवासस्थानीही पोहोचले आहेत.