मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल औरंगाबादेतून (Aurangabad) केलेल्या भाषणानंतर राज्यात एका नव्या वादाला सुरुवात झाली. हिंदुत्वादाची शाल पांघरलेल्या ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्दयानंतर आणखी एका विषयात हात घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) बांधली असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर आता खुद्द लोकमान्य टिळकांच्या खापर पणतू असलेल्या कुणाल टिळक (Kunal Tilak) यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवादी असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांनी ब्राम्हण द्वेषाचं राजकारण केलं असं म्हणताना त्यांनी पुढे असंही सांगितलं की, छत्रपती शिवरायांची रायगडावरील समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधून काढली. त्यानंतर आता लोकमान्य टिळकांच्या खापर पणतु असलेल्या कुणाल टिळकांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी बांधली असा दावा टिळक कुटुंब करत नाही असं कुणाल टिळकांनी सांगितलं. तसंच लोकमान्य टिळकांच्या कामाला कुणाचीही पावती लागत नाही. मराठी माणसाच्या मनात असलेलं त्यांचं स्थान कायम राहील असं कुणाल टिळक म्हणाले.