रत्नागिरी | निसार शेख : कोकणात (Konkan) होणाऱ्या रिफायनरीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. समर्थकांविरोधात रिफायनरी विरोधकही पुन्हा एकदा मैदानात उतरलो आहेत. मात्र या रिफायनरीवरुन आता शिवसेनेची (Shivsena) गोची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील रिफायनरीला शिवसेनेचा पाठिंबा आहे की विरोध? यावर अजूनही चर्चाच सुरू आहेत. ते मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लिहिलेलं पत्र त्याला कारण आहे.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रामध्ये राजापूर तालुक्यातील बारसू गाव आणि आसपासची जवळपास 13 हजार एकर जागा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, त्यानंतरदेखील शिवसेनेची भूमिका स्थानिकांबरोबर राहण्याची असल्याचं सेनेच्याच नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, रिफायनरीबाबत ठोस भूमिका घेण्यास शिवसेनेची गोची होत नाही ना? असा सवाल निर्माण झाला आहे.
शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन आमदार राजन साळवी यांनी केलं होतं. मात्र, रिफायनरीबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारल्यानंतर मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी संभ्रम निर्माण करणारं उत्तर दिलं होतं. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत पत्र लिहिणे हा शासकीय भाग आहे असं अनिल परब म्हणाले होते. स्थानिकांना विश्वासात घेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत रिफायनरीबाबत निर्णय घेतला जाईल' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्वाचं म्हणजे अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रिफायनरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनीच असं उत्तर दिल्याने शिवसेनेची भूमिका नेमकी काय? याबाबत चर्चा रंगली आहे