व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि सुनील नारायणच्या वादळी खेळीमुळं कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरोधात मोठा विजय मिळवला. घरेलू मैदानावर आरसीबीचा ७ विकेट्सने पराभव करून कोलकाताने या हंगामातील सलग दुसऱ्या विजयावार शिक्कामोर्तब केलं. घरेलू मैदानाच्या बाहेर सामना जिंकणारा कोलकाता हा पहिला संघ ठरला आहे. बंगलोरच्या मैदानावर कोलकाताचा हा सहावा विजय आहे. २०१५ नंतर कोलकाता नाईट रायडर्सने बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणताच सामना गमावला नाहीय. दरम्यान, या विजयामुळे कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बंगलोरचा पराभव झाल्याने आरसीबी टॉप-४ मधून बाहेर झाली असून सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.
आयपीएल २०२४ च्या दहाव्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान तिसऱ्या आणि हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान तिन्ही संघांना चा-चार अंक मिळाले आहेत. परंतु, चांगल्या रन रेटच्या आधारावर चेन्नई सुपर किंग्ज अव्वल स्थानी आहे. यानंतर पंजाब किंग्ज पाचव्या आणि गुजरात टायटन्स सातव्या स्थानावर आहे. तर दिल्ली आठव्या, मुंबई नवव्या आणि लखनौ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर आरसीबीसाठी विराट कोहलीने पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी केली. चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर कोहलीने नाबाद ८३ धावांची खेळी केली. या धावांच्या जोरावर आरसीबीने ६ विकेट्स गमावून १८२ धावा केल्या. कोहलीने कॅमरून ग्रीनसोबत (३३) दुसऱ्या विकेटसाठी ६५ आणि ग्लेन मॅक्सवेलसोबत (२८) तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागिदारी केली. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकांमध्ये ८ चेंडूत ३ षटकार मारून २० धावा केल्या.
आरसीबीने दिलेल्या १८३ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या सुनील नारायण आणि फिलिप सॉल्टने सलामीला आक्रमक फलंदाजी केली. सॉल्टने सिराजच्या पहिल्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारला. तर नारायणने तिसऱ्या षटकात अल्जारी जोसेफला दोन षटकार मारले. नारायण आणि फिल सॉल्टने पहिल्या विकेटसाठी ६.३ षटकात ८६ धावा केल्या. सॉल्टने २० चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीनं ३० धावा केल्या.
तर नारायणने २२ चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ४७ धावांची खेळी केली. तसच व्येंकटेश अय्यरने ३० चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ३९ धावा केल्या. कोलकाताने १६.६ षटकांमध्येच सामना जिंकला आणि त्यांच्या संघाचा रनरेट चांगला केला.