मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर आज किरीट सोमय्या आज मुंबईत (Kirit Somaiya in Mumbai) दाखल झाले. यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. खोटे गुन्हे दाखल करायचे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करायची हे महाराष्ट्रात पहिल्यांदा होतंय असं सोमय्या आज म्हणाले. तसंच विक्रांत बचाव मोहिमेत एक रुपयाचा सुद्धा गैरव्यवहार झाला नाही असं सोमय्या म्हणाले.
मागचे काही दिवस नॉट रिचेबल असणाऱ्या सोमय्यांना तुम्ही कुठे होतात असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी आपण होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल होतो असं सोमय्यांनी सांगितलं. होम वर्क करण्यासाठी काही वेळेस नॉट रिचेबल व्हावं लागतं असं सोमय्या म्हणाले. तसंच महाविकास आघाडीला आणखी खोल खड्डा खणण्यासाठी आपण संधी देत होतो, आपल्याला माहिती होतं की कोर्ट या प्रकरणात प्रश्न विचारेल असं सोमय्यांनी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप त्यांनी माफियागिरी सुरु असल्याचा आरोप केला. तसंच कोणत्या आधारावर एफआयआर केला असा सवाल सोमय्यांनी केला. दोन दिवसांनी अनिल परब यांची केस दापोली कोर्टात येणार आहे, तसंच हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांच्या केसला देखील गती मिळणार असं सोमय्या म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंचं उद्धट सरकार किरीट सोमय्यांचं तोंड बंद करु शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.