Kargil Vijay Diwas : 'कारगिल विजय दिवस'निमित्त आज देशभरात शहींदांचं स्मरण करण्यात आलं. 2021 च्या शेरशाह चित्रपटात कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ मलोत्रानेही यावेळी आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत. कारगिलमध्ये भारतीय सैन्याने दिलेलं बलिदान नेहमीच आदरानं लक्षात ठेवलं पाहिजे. कारगिल विजय दिवसानिमित्त एका खास संवादादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) शेरशाह चित्रपटानंतर आपल्या आयुष्यात या दिवसाचं महत्त्व खूप वाढल्याचं सांगितलं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी, प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं होतं.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात कारगिल दिवसाचं महत्त्व अधिकच वाढल्याचं तो सांगतो. त्याने शेरशाहच्या शूटिंगदरम्यान कारगिल युद्धात सामील झालेल्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा जवळून समजून घेतल्या. सिद्धार्थने सांगितलं की, गेल्यावर्षी शेरशाहच्या शूटिंगदरम्यान मला कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यादरम्यान मला लष्करातील वरिष्ठ अधिकारी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली.
शेरशाहमध्ये कॅप्टन विक्रम बात्राची भूमिका साकारली होती
सैनिकांचं जीवन जवळून समजून, जाणून घेतल्यावर, कारगिल विजय दिवसाबद्दल माझा आदर आणखीनच वाढला आहे. हा एक असा प्रसंग आहे ज्याचा सर्व भारतीयांनी आदर केला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे असं सिद्धार्थ म्हणाला. कॅप्टन विक्रम बत्रा 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. या चित्रपटात त्यांचं पात्र सिद्धार्थने शेरशाह चित्रपटात साकारलं होतं.
सिद्धार्थ यावेळी बोलताना म्हणाला, भारताचे नागरिक म्हणून आपण कोणाच्या तरी बलिदानाच्या बदल्यात मिळालेल्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. मी लष्करी कुटुंबातून आलो आहे, माझे आजोबा सैन्यात होते. पण तो काळ मला अनुभवता आला नाही हे माझं दुर्दैव आहे. पण विक्रम बत्राच्या व्यक्तिरेखेमुळे मला ते अनुभवायला मिळालं. याबद्दल मला नेहमीच चांगला आनंद राहील. भारताकडे इतके धाडसी आणि उत्कृष्ट सैन्य आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं सिद्धार्थ म्हणाला.