प्रशांत जगताप, सातारा
कराड येथे गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे (Bank Of India) ATM जिलेटीनच्या कांड्या लावून उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावलाय. ATM जिलेटीन लावून फोडणाऱ्या एका चोरट्यास कराडच्या दामिनी पथकाच्या पोलिसांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केलीये. या इमारतीत शालेय आणि कॉलेजची 200 हून अधिक विद्यार्थी शिकण्यास आणि राहण्यास आहेत. जर जिलेटीनचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
पोलिस आल्याचे पाहताच चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यावर विषारी स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली. चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारल्याने पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवाची बाजी लावून पोलिसांनी ATM फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्याला ताब्यात घेतलं असून अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी कराड शहरात आणि परिसरात नाकाबंदी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. जिलेटीनच्या कांड्या निकामी करण्यासाठी साताऱ्यातून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक श्वान पथकासह कराड येथे दाखल झाले आहे.
चोरट्यांनी ATM मशीनच्या आत जिलेटीनच्या 2 कांड्या पेरून ठेवल्या होत्या.. केवळ त्यांना बॅटरीच्या आधारे उडवून देण्याचे बाकी होते..वेळीच पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे अन्यथा जिलेटीन कांड्या फुटून मोठा स्फोट झाला असता तर ATM सह संपूर्ण इमारत या स्फोटात उडाली असती..सध्या या इमारतीत 200 हुन अधिक विद्यार्थींना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे.. घटनास्थळी पोलीस आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली असून जिलेटीन च्या कांड्या निकामी करण्याचे काम सुरू आहे.