बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी (15 जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय, उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर उपस्थित होते. या भेटीनंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका देखील केली. अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचं सांगत राज्यातील सत्तासंघर्षावर दुःख व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे लवकरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री व भाजपा खासदार कंगना रणौत या मुख्यमंत्री शिंदेंसाठी मैदानात उतरल्या आहेत. कंगना रणौत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की राजकारणात, युती, आघाडी, पक्ष व नेत्यांमधील करार आणि एखाद्या पक्षाचं विभाजन होणं अत्यंत सामान्य तसेच संवैधानिक (घटनात्मक) बाब आहे. 1907 साली, 1971 साली काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं होतं. राजकारणी लोक राजकारणात राजकारण करणार नाहीत तर मग काय गोलगप्पे (पाणीपुरी) विकणार का?
कंगना रणौत म्हणाल्या, शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा, प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे. धर्म असं सांगतो की, राजाच जर प्रजेचं शोषण करू लागला तर देशद्रोह हा शेवटचा धर्म आहे. शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर देशद्रोही, गद्दार व विश्वासघातकी असल्याचा आरोप करत सर्वांचा भावना दुखावल्या आहेत. शंकराचार्य अशा छोट्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगून हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत.