अमझद खान | कल्याण : गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात येतील अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे (Kalyan Dombivli Municipality) आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत गणेशोत्सव न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळासोबत आज कल्याण डोंबिवली महापालिका आणि पोलिस प्रशासनाची बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडली. आयुक्त डॉ. दांगडे यांच्यासह पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
आयुक्त डॉ.दांगडे यांनी सांगितले की, पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविता येत नव्हते. आत्ता पाऊस कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविले जातील. तसेच पीओपीच्या मूतींना महापालिका हद्दीत बंदी आहे. उल्हासनगरातून पीओपीच्या मूर्ती कल्याण डोंबिवली हद्दीत विजर्सनासाठी येणार असतील तर उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तसे सूचित केले जाईल. गणेशोत्सव मंडळाना परवानगीसाठी एक खिडकी योजना महापालिकेकडून राबविली जाणार आहे. तसेच मंडप शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय अग्नीशमन परवानगीकरीता आकारण्यात येणा:या शुल्कात ५० टक्के सूट दिली आहे.
पोलिस परवानगी ऑनलाईन
पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांना पोलिस परवानगी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची गरज नाही. ऑन लाईन मिळणार. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून गणेशोत्सवावर देखरेख ठेवली जाणार आहे. शिवाय आणखीन काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास महापालिका प्रशासनास सांगितले आहे.