लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांनी माघार घेतली आहे. यावेळी माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे पी गावित म्हणाले की, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. परंतु इथं आम्ही आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या. अशा प्रकारची आम्हाला त्यांनी विनंती केली.
पक्षानेसुद्धा आम्हाला सूचना केली की, ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे. म्हणून ही उमेदवारी आम्ही मागे घेत आहोत. या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीलाच फायदा झाला असता. या दोघांमध्ये जी लढत होईल. त्या लढतीचे परिणाम काय होतील हे काही सांगता येणार नाही आता. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो भास्कर भगरे लोकांमधला उमेदवार नाही आहे. त्याला प्रयत्न करुन आपल्याला निवडून आणावं लागेल. त्याच्यासाठी सगळे इथं लोक एकवटून कामाला लागले. तरच भास्कर भगरेंचे यश शक्य आहे. अन्यथा ते पण अडचणीत येऊ शकतात. अशाप्रकारची परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्ही तर पाठिंबा दिला. पक्षाने आम्हाला सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगरे यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. आम्ही त्यांचे काम पण ईमानदारीचे करु. त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु राष्ट्रवादीनेसुद्धा आता जोरात तयारीला लागले पाहिजे. आमच्या उमेदवारीबद्दल सर्व दूरपर्यंत मतदारांमध्ये आमचे काम आणि आमचे नाव हे होते. भास्कर भगरे आतापर्यंत स्कूल मास्तर म्हणून होते. त्यांना अचानकपणे शाळेमधून आणून लोकसभेचं उमेदवार केलेलं आहे. आम्ही पक्षाच्या बांधलेल्या शिस्तीचे आहोत. त्यामुळे पक्षाने आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आता मागे घेतो आहे. आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही उमेदवारी मागे घेत आहोत. असे जे पी गावित म्हणाले.