हबीबा अली (Habiba Ali) आणि प्रियंका शर्मा (Priyanka Sharma)… दोन वेगवेगळी नावं… परंतू दोघींची डिग्री, गुण आणि अनुभवही सारखाच… फरक फक्त धर्माचा! दोघीही नोकरीसाठी अर्ज करतात मात्र प्रियंका शर्माच्या सी.व्ही. (CV) वर नोकरीची मोहोर लावली जाते. खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधीमध्ये हा प्रकार वाढायला लागलायं. अलीकडेच ‘लेड बाय फाऊंडेशन’ (Led By Foundation) नावाच्या एका बिगर-शासकीय संस्थेने नेमक्या याच विषयावर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि भारतात उच्चशिक्षित मुस्लिम मुलींसोबत नोकरी मिळवण्यासाठी कसा भेदभाव केला जातोय याचा धक्कादायक खुलासा समोर आला.
‘लेड बाय फाउंडेशन’ने ‘हायरिंग बायसः इम्प्लॉयमेंट फॉर मुस्लिम वूमन इन एंट्री लेवल रोल्स’ अशा शिर्षकाखाली हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. नोकरी मिळवून देणाऱ्या हजारो वेबसाईटचा सखोल अभ्यास करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. हा धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी संस्थेने प्रियंका शर्मा आणि हबीबा अली अशा दोन वेगवेगळ्या नावाने बायोडाटा आणि प्रोफाईल तयार करून नोकरीसाठी दहा महिन्यांच्या कालावधीत किमान दोन हजार जॉब साईट्सवर अर्ज करण्यात आले.त्यानुसार…
हिंदू महिलेच्या नोकरीच्या अर्जावर 208 सकारात्मक प्रतिसाद मिळाले तर मुस्लिम महिलेला निम्म्यापेक्षा कमी म्हणजे 103 सकारात्मक प्रतिसाद मिळाले.
नोकरीसाठी प्रियंकाच्या प्रोफाईलवू 41.3 टक्के फोन कॉल आले तर हे प्रमाण हबीबाच्या बाबतीत 12.6 टक्के इतके होते.
उत्तर भारतात अशा भेदभावाचे प्रमाण 59 टक्के तर दक्षिण भारतात हे प्रमाण 60 टक्के होते.
मुस्लिम महिलांना नोकरी न देण्यामागे इ-लर्निंग, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, मार्केटिंग आणि आयटी इंडस्ट्री अशा सगळ्याच क्षेत्रांचा सहभाग आहे.
तब्बसूम मुंबईची (Mumbai) एक डॉक्टर आहे. उत्तम मार्कांसह वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केले. मात्र काही केल्या तिला जॉब मिळेना. तिला वाटलं कदाचित तिच्यापेक्षा अधिक योग्य उमेदवार मुलाखतीसाठी आले असतील. काही दिवसांनी तब्बसूमने एका ओळखीच्या क्लिनिकमध्ये अर्ज केला जे क्लिनिक एक मुस्लिम डॉक्टर चालवायचे. ओळखीचे डॉक्टर असल्यामुळे त्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करायला मिळेल अशी खात्री असलेल्या तब्बसूमला जेव्हा डॉक्टराच्या पत्नीने सांगितले की, “तु हिजाब परिधान करतेस, त्यामुळे क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना कदाचित ते आवडणार नाही, त्यामुळे इथे तुला नोकरी मिळेल या आशेवर राहू नकोस’’ तेव्हा तब्बसूमला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की मला नोकरी का मिळत नाहीये… नोकरीसाठी अर्ज केल्यावर मला नेहमी मुलाखतीला बोलवायचे पण मुलाखतीला जेव्हा मी समोर बसायची तेव्हा मला नकार यायचा’’ असे तब्बसूम सांगते.
मुस्लिम समाजात असेही मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. नोकरीच्या क्षेत्रात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व अगदी कमी आहे.आणि त्यातच उच्चशिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींच्या वाट्याला अलीकडे असे अनुभव येत आहेत. खास करून ज्या मुली हिजाब परिधान करतात त्यांच्यासाठी नोकरी मिळणे अशक्य होत चालले आहे.
‘लेड बाय फाउंडेशन’च्या संचालिका डॉक्टर रोहा शादाब (Roha Shadab) म्हणतात की, नोकरी क्षेत्रात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व आणि त्यासंबंधी होणारा भेदभाव यावर भारतात आजपर्यंत कसलेही संशोधन जालेले नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सच्चर समितीच्या अहवालात मुस्लिम महिलांच्या प्रतिनिधित्वावर चर्चा झाली होती. मात्र हा अहवाल अद्याप लागू झालेला नाही. नोकरीच्या बाबतीत मुस्लिम मुलींशी कसा भेदभाव केला जातो याबाबत आम्ही पहिल्यांदाच असे संशोधनपर काम केले आहे.