राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 वर्ष पूर्ण झालीत. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजच्या मैदानावर वर्धापन दिन साजरा केला. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शरद पवार...! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगरच्या पवित्र भूमीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या पक्षाचे आधारवड आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदारांचा भव्य सन्मान देखील यावेळी संपन्न झाला. पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आपण अनेक संकटं पाहिली. पवार साहेबांनी पुढे राहून त्यांना तोंड दिले. सत्ता आली, गेली. मात्र डोळ्यात पाणी आणून पवार साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्यामुळेच कमी जागा मिळून सुद्धा ८ जागा जिंकण्याची किमया आपल्या पक्षाने केली. पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची काही जणांची खेळी होती. सुप्रिया ताईंचा पराभव व्हावा यासाठी सर्व शक्ती एकवटली होती. मात्र बारामतीत न अडकता पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. पूर्वी दिवसाला पंधरा सभा पवार साहेब घ्यायचे. आपल्या मतदारसंघात पवार साहेबांची सभा झाली की, आपण निवडणूक जिंकलो ही प्रत्येक आमदाराची खात्री होती. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नसते, कारण आमच्या शाळेचे हेडमास्तर पवार साहेब आहेत. त्याकाळी देखील माझ्यासारख्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. आज पुन्हा एकदा त्याच मोड मध्ये पवार साहेब आहेत.
भाजपा सारखे ४०० पार म्हणण्याची मी चूक करणार नाही. पण विधानसभेत प्रत्येक सीट निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. समोरच्याला अंदाज येऊ न देता आपल्याला विजय मिळवायचा आहे. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कोणा एकाची नाही. पुढील चार महिने आपण एकदिलाने राहू. त्यामुळे जाहीर वक्तव्यं करणे बंद करा. टीम वर्क ज्यावेळी होते, तेव्हाच विजय मिळतो. पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले आहे. या जिल्ह्याने संपत्ती, सत्ता यास झुगारून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार केले. या मातीने स्वाभिमान शिकवला आहे, लढण्याची प्रेरणा दिली आहे त्यामुळे येथील लोकांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही येथे सभा घेतली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी समर्पणाने कार्य केले. अनेक वक्त्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांचेही आभार. नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा इतिहास पाहता हे सरकार पाच वर्ष टिकेल याची शाश्वती नाही. नरेंद्र मोदींना संपूर्ण देशातून नापसंती मिळाली आहे. राज्यातील नेतृत्वाला देखील नापसंती आहे, हे ध्यानात ठेवा. आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रश्नांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमचे दोन्ही संसदरत्न @supriya_sule ताई आणि डॉ. @kolhe_amol पुन्हा निवडून आले. विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी संपूर्ण कुटुंबांसह एकत्र बसून पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि @DrmpMohite यांनी विजय मिळवला. विदर्भात @amarkale_speaks यांच्या रूपात आपल्याला नवीन चेहरा गवसला. पैसा नसतानाही निवडणुकीत विजय मिळवू शकतो हे @BhaskarBhagare साहेबांनी दाखवून दिले. बाळ्या मामा म्हात्रे यांनी जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकली. @bajrangsonwane_बाप्पा यांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपले सरकार आले की बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे काम आम्ही करून दाखवू. @Nilesh_LankeMLA यांनी निवडणुकीआधीच पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यातच त्यांचा विजय निश्चित होता. पिपाणी हे चिन्ह नसते तर साताऱ्यातील आपले हाडाचे कार्यकर्ते @shindespeaks नक्कीच निवडून आले असते. रावेर येथे श्रीराम पाटील यांनी सुद्धा कडवी झुंज दिली. महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय विश्वासाने आपले आठ खासदार निवडून दिले आहेत. विजयाने हुरळून जाऊ नका. प्रत्येक बूथवर लक्ष द्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून, प्रत्येक जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला विधानसभेत देखील यश मिळवायचे आहे. असे जयंत पाटील म्हणाले.