राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आजचे बजेट म्हणजे 'चादर लगी फटने और खैरात लगी बटने' असेच म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसतोय. आता पराभव समोर दिसत असताना, आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट आहे.
महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेट पेक्षा ४६ हजार कोटींचे अधिकची प्रोव्हिजन केली आहे. मागच्या वर्षी १ लाख ३० कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट २० हजार कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे.निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलेले आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, एमएससीबीची मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारीचे लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की, हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीला देऊ केलेली मदत अनेक वारकऱ्यांनी नाकारली आहे. शेकडो वर्षापासून सुरू असलेली महाराष्ट्रातील वारी ही स्वाभिमानाची वारी आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करून मोठेपणा मिरवणे सरकारच्या दृष्टीने योग्य नाही. असे जयंत पाटील म्हणाले.