महाड येथे मनुस्मृतीचं दहन करत आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांच्याकडून ट्विट करत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जयंत पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे. असे जयंत पाटील म्हणाले.