नवी दिल्ली : जपानमध्ये लँडिंग करताना विमानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. टोकियो विमानतळावर ही घटना घडली. विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याचा संशय असल्याचे जपानी वृत्तसंस्थेने सांगितले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वृत्तांनुसार, फ्लाइटचा नंबर JAL 516 होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. जपान एअरलाइन्स फ्लाइट 516 जपानी स्थानिक वेळेनुसार 4 वाजता न्यू चिटोस विमानतळावरून निघाली आणि 5:40 वाजता हानेडा येथे उतरणार होती. परंतु, लँडिंग करताना अचानक विमानाला भीषण आग लागली. या आगाीवर अग्निशमन दल नियंत्रण मिळवण्याच प्रयत्न करत आहे.
दरम्यान, एकूण ३६७ लोकांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजत आहे. त्याच वेळी, जपान तटरक्षक दलाने सांगितले आहे की जेएएल 516 ची टक्कर झालेल्या विमानातील पाच क्रू सदस्य बेपत्ता आहेत, वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.