जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोहम्मद अमरेज हा मजूर बिहारमधील मधेपुरा येथील रहिवासी होता. बंदिपारो जिल्ह्यातील अजस भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी या स्थलांतरित मजुरावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानंतर मजुराला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, "मध्यरात्री, बांदीपोरा येथे बिहारमधील मोहम्मद अमरेज या स्थलांतरित मजुरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात तो मजूर गंभीर जखमी झाला. त्यानतंर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता त्यांचा मृत्यू झाला." मृताच्या भावाने सांगितलं की, 'दुपारी 12.20 वाजता माझ्या भावाने मला उठवलं आणि गोळीबार सुरू असल्याचं सांगितले. तेव्हा पाहिलं की, मोहम्मद तिथे नव्हता, आम्हाला वाटलं की तो टॉयलेटला गेला होता. आम्ही चौकशीसाठी गेलो असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर आम्ही सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधला. त्याला हाजीन येथे नेण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला.
गेल्या आठवडाभरात स्थलांतरित मजुरांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. गेल्या आठवड्यात बिहारमधील मोहम्मद मुमताज या स्थलांतरित मजुराची हत्या करण्यात आली होती. पुलवामा जिल्ह्यातील गदुरा गावात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकलं होतं. या हल्ल्यात मुमताज ठार झाली, तर दोन जण जखमी झाले.