श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याचे समजत आहे.
वृत्तानुसार, 20 डिसेंबरच्या रात्रीपासून राजौरीतील थानमंडीमध्ये कारवाई सुरू आहे. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास लष्कराची दोन वाहने ऑपरेशन साईटवर पोहोचली, या गाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बुफलियाजमध्ये रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. सैनिक एका मोहिमेवर जात होते आणि याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. अद्यापही परिसरात चकमक सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सैनिक पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.